देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, कल्याण-डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून (KDMC) जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयातील भिंती, शहरातील उद्यानाच्या आणि सार्वजनिक परिसराच्या संरक्षण भिंतीवर पोस्टर्स, बॅनर लावत जनजागृती सुरु केली आहे. पाणी जपून वापरा, स्वच्छता पाळा, यासारख्या जाहिराती केल्या जात आहेत.
याबाबतचे निर्देश केंद्र सरकारने देत जाहिरातीचे तयार बॅनर सर्व महापालिकांना पाठवले असून हेच बॅनर महापालिकांनी प्रसिद्ध केले आहेत. केंद्र सरकारकडून आल्यामुळे हे सर्व बॅनर हिंदी भाषेतून आहेत. पण हिंदी भाषेतून असलेल्या या जाहीरातींना मनसेने (MNS) विरोध केला आहे.
महाराष्ट्राच्या राजभाषेतून म्हणजेच मराठीतूनच हे बॅनर असावेत अशी मनसेची आग्रही मागणी आहे. पण, वारंवार मागणी करूनही पालिकेकडून हे पोष्टर्स बॅनर बदलण्यात आलेले नसल्याने अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या जाहिरात फलकावर काळं फासून निषेध व्यक्त केला.