विधानसभा निवडणुकीत मनसे - भाजपच्या एकत्र येण्यात एकनाथ शिंदेंनी रेड सिग्नल लावला आणि मनसे भाजप युतीला शिंदेंनीच खो घातला अशी चर्चा मनसेच्या नेते-पदाधिका-यांच्या बैठकीत रंगली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत युती करायची झाली तरी शिंदेंचं करायचं काय असा प्रश्न मनसे बैठकीत चर्चेला आला.
विधानसभा आणि लोकसभेत एकनाथ शिंदेंमुळे मनसे महायुतीत येऊ शकली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. मनसेला महायुतीत घेण्यासाठी शिंदेंचा नकार असल्यानं मनसे महायुतीपासून दूर राहिली. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचं नुकसान झालं आहे. मात्र आता पराभव स्वीकारून पुन्हा एकदा कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहे. मात्र आता नव्या मित्रासोबत काम करण्याचे संकेत मनसैनिकांन मिळत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीकरता मनसे भाजपला युतीची टाळी देण्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे
महापालिका निवडणूकीत मनसे महायुतीकडे टाळीसाठी हात पुढे करणार?
आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती चाचपणीच्या चर्चा
लोकसभा, विधानसभेत शिंदेंचा नकार असल्याने मनसेची युती होऊ शकली नाही? अशी सूत्रांची माहिती आहे.
विधानसभेत मनसे आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढल्यानं दोघांचंही नुकसान झालं.
2 युती न केल्यानं झालेलं नुकसान लक्षात घेता या निवडणूकीत युतीच्या चर्चा करताना स्ट्रॅटेजी बदलावी लागणार असा सूर मनसे बैठकीत होता. त्यामुळे; आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबींवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार आहे. युतीसाठी मनसे पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर युतीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
मनसे आणि भाजप युतीकडे बघतच नसल्याचं सांगून आदित्य ठाकरेंनी दोघांना चिमटा काढला आहे. पुन्हा एकदा मनसे कात टाकून उभं राहण्याची भाषा करत आहे. यापूर्वीही मनसेनं अनेकदा नव्या उमेदीची भाषा करत अगदी झेंडा आणि राजकीय मुद्दे बदलत कुस बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र आता आता अप्रत्यक्ष नव्हे प्रत्यक्ष राजकीय युती करत मनसे बेरजेचं राजकारण करु पाहत आहे. मात्र महापालिका निवडणुकीत शिंदेंचं मनसेला ग्रीन सिग्नल मिळणार का? हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच..