प्रताप नाईक, अरुण मेहेत्रे आणि कृष्णात पाटील, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात पूरस्थितीमुळे (Kolhapur Flood) हाहाकार उडालाय. 2019 च्या कटू आठवणी पुन्हा जागा झाल्या आहेत. धो-धो पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटलाय. एनडीआरएफ (NDRF) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान पूरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करतायेत. (more than hundred villages has disconnected due to Kolhapur Flood)
छतापर्यंत आलेलं पाणी, नजर जाईल तिथवर पाणीच पाणी. कुणाच्या आशेवर रहायचं,आपली सुटका कधी होणार? ही धाकधुक कोल्हापुरातल्या अनेक नागरिकांच्या मनात आहे. अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. आंबेवाडी गावाला पुराचा वेढा आहे. चिखलीतही पाणीच पाणी झालंय. १५०० हून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय.
शुक्रवारपासून कोसळणारा पाऊस आणि धरणांतून सोडलेलं पाणी यामुळं पूरस्थिती गंभीर झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने 2019 च्या भयानक महापुराचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 56 फूट 1 इंचावर जाऊन पोहोचली. पंचगंगेची पातळी 2019 ला 55 फूट 7 इंच इतकी होती.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद
या पूरस्थितीमुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गही बंद झालाय. कृष्णा नदी पात्राबाहेर आली की पहिल्यांदा पाणी लागतं ते नृसिंहवाडीतील दत्त दिगंबरांच्या पायाला.. सध्या मंदिर पाण्याखाली गेलंय. नृसिंहवाडीत नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. इथलं संपूर्ण बसस्थानक पाण्याखाली गेलंय. व्यापा-यांचे अक्षरश: कंबरडे मोडलंय.
अगदी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय देखील पाण्यात आहे. तीन ते चार फूट पाणी आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील पाण्यात आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना मदत करणार तरी कोण, याची चिंता आणखी वाढलीय.