मेघा कुचिक, झी मीडिया : एक्स्प्रेस वे, तळेगाव टोल नाका; वेळ शुक्रवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास...
पुण्यातील काही होतकरू युवक रंगकर्मी मंडळी मुंबईमध्ये त्यांची नेहमीची कामे आणि मीटिंगसाठी एका गाडीतून जात होते. अचानक एक ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना अडवतो. गाडी बाजूला घेण्यास सांगतो आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची मागणी करतो.
वाहन परवाना, नोंदणी, प्रदूषण प्रमाणपत्र अशी सर्व गाडीची कागदपत्रे या युवकाजवळ होती. संबंधित पोलिसाने त्यांची तपासणी देखील केली. एवढे करूनहीं तो थांबला नाही. तर त्याने सर्व गाडीची तपासणी केली. त्यातही काही आक्षेपार्ह सापडले नाही.
सापडले ते मात्र पत्त्यांचे दोन कॅट!!!
झाले...! वाहतूक पोलिसांनी हाच मुद्दा पकडला आणि तुमच्या गाडीत पत्ते सापडले आहेत, याचाच अर्थ तुम्ही दोन नंबरचे धंदे करता, जुगार खेळता असा आरोप लावला. या युवा रंगकर्मींकडून दंड, पावती उकळण्याची भाषा करण्यास प्रारंभ केला.
या सर्व अनपेक्षित प्रकारानंतर देखील ते युवक मात्र डगमगले नाहीत. आपण कोणतीही चूक केलेली नाही, तर विनाकारण हा जाच का सहन करायचा? अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाडीमध्ये पत्ते ठेवणे हे नियमबाह्य आहे, असे कोणत्या नियमात सांगितले आहे - तो नियम दाखवा अशी विचारणा देखील या पोलिसाकडे केली. तसा जर नियम असेल तर आम्ही लगेच दंडाची रक्कम भरण्यास तयार आहोत, असे देखील या युवकांनी ठणकावून सांगितले.
युवकांच्या या पवित्र्यानंतर संबंधित पोलीस गोंधळून गेला! त्याने चक्क रस्ता दुभाजकावरून उडी मारून पलीकडील बाजूस असलेल्या आपल्या पोलीस चौकीकडे पलायन केले.
आता मात्र हे युवक देखील इरेला पेटले होते! त्यांनी देखील या पोलिसामागे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चौकीपर्यंत पाठलाग केला आणि तेथे त्याला जाब विचारण्यास प्रारंभ केला. युवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तिथे अजून एक वाहतूक पोलीस आला आणि त्याने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले.
मद्यप्राशन करून गाडी चालवणे, बेदरकारपणे गाडी चालवणे, असे प्रकार तरुणाईकडून घडत असतात. त्यामध्ये काही दुर्दैवी अपघातांमध्ये जीव देखील जातो! त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी काळजीच्या भूमिकेतून चौकशी करणे समजू शकतो. पण अशा पद्धतीने पैसे उकळण्यासाठी कोणाला त्रास देणे; एक पत्त्याचा कॅट सापडला असे कारण पुढे करून दंड वसुलीचा तगादा लावणे हे कितपत योग्य आहे?