School Bus Fees: काही दिवसांपूर्वीच एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. त्यापाठोपाठ रिक्षा-टॅक्सीचीदेखील भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता शालेय बसच्या भाड्यात 18 टक्के वाढ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेने दिली आहे. त्यामुळं येत्या 1 एप्रिलपासून पालकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी सांगितले की, शालेय बस उत्पादकांकडून बस आणि सुट्या भागांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. देखभाल खर्च महागला आहे. चांगली सेवा आणि सुरक्षितता नियमांचे पालन करण्यासाठी चालक, महिला मदतनीस आणि व्यवस्थापकांना पगारवाढ द्यावी लागते. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. पार्किंग शुल्क दुप्पट झाले आहे. आरटीओचा दंड वाढल्याने खर्चात आणखी भर पडली आहे. या वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी ही शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या शैक्षणिक वर्षापासून अर्थात १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध वाहनांवर राज्य सरकारने बंदी घातल्यास भाडेवाढ होणार नाही, असेही ‘एसबीओए’ने स्पष्ट केले. मुंबईसह राज्यात शालेय बसव्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सींमधूनही विद्यार्थी वाहतूक केली जाते. ही वाहतूक बेकायदा आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा घातल्यास दरवाढ रद्द करण्यात येईल, असे एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी तसेच कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे. नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे. प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे ११ टक्के आणि टॅक्सीचे भाडे १० टक्के वाढले आहे. तसेच कूल कॅबच्या भाड्यातही २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे.