अमर काणे, झी मीडिया, नागपूर : दिवाळी हा सर्वांसाठी जसा खरेदी, फराळ, मिठाईचा सण असतो पण चिमुरड्यांसाठी फटाके म्हणजेच त्यांची दिवाळी असते. 'आपल्याला घरातल्यांनी फटाके घेऊन द्यावेत, आपण मित्रांसोबत ते फोडावेत' हे अनेकांनी आपल्या लहानपणी केलेलं असंत. पाहिते न मिळाल्यावर घर डोक्यावर घेण्यासही मागे पुढे पाहिलेलं नसतं. आई-बाबा, आजी-आजोबांना आपल्या घरातील लहान मंडळींचे बालहट्ट पुरवावेच लागतात. यामधून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तरी कसे सुटतील ? त्यांच्या नातवानेही फटाक्यांसाठी हट्ट केला आणि हा सर्व मजेशीर प्रकार माध्यमांच्या कॅमेरामध्ये कैदही झालायं.
आजोबा-नातवाचं बॉंडींग
नितीन गडकरी आणि त्यांचा नातू निनाद यांच्यात एक वेगळंच बॉंडींग आहे. गडकरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून त्याच्यासाठी वेळ काढत असतात.
आज सकाळी निनाद आपल्या आजोबांसोबत पत्रकार परिषदेत गेला होता. पण त्याचं मन रमेना..त्याला ओढ होती ती फटाके खरेदीची..
पत्रकार परिषद संपताच तो आजोबांना घेऊन फटाक्यांच्या स्टॉलवर गेला. तिथे गडकरींना त्याला रॉकेट घेऊन दिलं पण ते त्याला नको होतं.
रॉकेट तर कोणाच्या पण घरात घुसतं असं तो आपल्या आबांना सांगतो. त्यावर आपण हे रॉकेट मैदानात फोडू असं ते त्याला समजावतात पण तो काही ऐकत नाही.
'रॉकेट नको आबा, बॉम्ब घ्या' असं तो म्हणतो. अखेर लाडक्या नातवाची मागणी गडकरींनी पूर्ण केली आणि त्याला हाताने फोडता येणारा आपटी बार घेऊन दिला.