Nanded Farmers: गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतक-यांना आता खरेदी केंद्रांवरही अडचणी येतायेत. नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदान नसल्याने गेल्या आठ ते दहा दिवसापासून शेतकऱ्यांना, कडाक्याच्या थंडीत सोयाबिनची राखण करावी लागतीये. शेतकऱ्यांच्या याच समस्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नांदेडच्या हदगाव येथील नाफेड खरेदी केंद्राबाहेर कडाक्याच्या थंडीत ट्रॅक्टरवर जेवणारे, तिथेच झोपणारे शेतकरी दिसतील. कष्टांन पिकवलेलं सोयाबीन चोरीला जाऊ नये यासाठी बळीराजा सोयाबीनची राखण करतायेत.बारदान नसल्याने शेतकऱ्यांवर हि वेळ आलीये.नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदानांचा तुटवडा असल्याने सोयाबीन खरेदी सध्या बंद आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून खरेदी केंद्रावर शेतकरी ताटकळत आहेत. लाखोंच्या या पोशिंद्यांसमोर अनेक समस्या आहेत.
हदगावमधील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतक-यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. विक्रीची तारीख कळल्यानंतर त्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. त्यानंतर मात्र बारदानं म्हणजेच पोती संपल्याचं कारण सांगत खरेदी बंद करण्यात आली.
खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यावर नाफेडने हात वर करत स्वतः बारदानं आणा, असं सुनावलं. मात्र एका बारदान्याची किंमत 46 रुपये इतकी आहे. त्याचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना बसतोय. त्यातच सोयबीन आणलेल्या ट्रॅक्टरचं एका दिवसाचं भाडं दीड ते दोन हजार रुपये असल्याने तोही भार शेतकऱ्यांवरच पडतोय. खरंतर नाफेड केंद्रावर शेतकरी नोंदणी करत असल्याने किती क्विंटल सोयबीन येणार याची नाफेडला आधीच माहीती असते..त्यामुळे बारदान्यांचं नियोजन का केलं नाही...असा प्रश्न उपस्थित होतोय. आता कृषीमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जातीये.