Nandurbar News : जपान (Japan) हा देश जगाच्या नकाशावर कुठे आहे हे अनेकांना माहिती आहे. मात्र नंदुरबारमध्ये (Nandurbar) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) भोंगळ कारभारामुळे जपान थेट सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये येऊन वसलं आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. नंदुरबारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन दिशादर्शक फलक (Name Plate) लावण्यात आले आहेत. या दिशादर्शक फलकावर नंदुरबार जिल्ह्यात जपान नावाचे गाव असल्याचा फलक लावण्यात आला आहे.
जपान नावाचा फलक पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. अनेकांसाठी हा मस्करीचा, उत्सुकतेचा विषय बनला आहे. सातासमुद्रापार असलेलं जपान हे नंदुरबारच्या गावात कसं आलं आणि ते नक्की कुठे आहे याचा शोध अनेकजण घेत आहे. पण बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे. गावाचं मूळ नाव हे जमाना आहे. पण बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचं नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे.
"हा रस्ता सरळ जमाना गावात जातो. पण दिशादर्शक फलकावर जमाना ऐवजी जपान लिहीण्यात आलं आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा आश्चर्यचकित झालो आहोत. हा रस्ता नक्की कुठे जातो असाही प्रश्न आम्हाला पडला आहे," असे एका गावकऱ्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, सातपुड्याच्या दुर्गम भागातून जपानला जाण्यासाठी रस्ता असल्याचे कळल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारामुळे हा सगळा गोंधळ उडाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील डाब येथे हा नामफलक लावण्यात आला आहे. गावाच्या दिशादर्शक फलकावर थेट जपान असा उल्लेख केल्याने गावकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेला डाब, तोडीकुंड, चिवलउतारा, खुंटगव्हाण, ओरपाफाटा आणि जमाना गावाकडे जाण्यासाठी डांब येथूनच रस्ता जातो. त्यामुळे या ठिकाणी तो दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. दिशादर्शक फलकावर शेवटचे गाव जपान असे लिहिल्याने नंदुरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.