अमर काणे, नागपूर : एका नागपुरकरांनं अवघ्या तीन ग्रॅमचे एअरो मॉडेल तयार केलं आहे. देशातील सगळ्यात हलक असं हे रबर पॉवर्ड फ्री फ्लाईट एअरो मॉडेल आहे. डॉ. राजेश जोशी यांनी तब्बल 35 वर्षांच्या एअरो मॉ़डेलिंग क्षेत्रातील अथक प्रयत्नानंतर हा अविष्कार साकारला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आपलं या एअरो मॉडेलिंग क्षेत्रातील ज्ञान नव्या पिढीलाही शिकवलं असून त्यांचा शिष्य महेश्वर ढोणे या नववीत शिकणा-या शिष्यानंही साडेतीन ग्रॅमचं एअरो मॉडेल साकारलं..
पेनी प्लेन असंही या हलक्याशा एअरो मॉडेलला म्हटलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे पेनी प्लेन मिनिटभर घिरट्या घालू शकतं. नागपुरातील हौशी एअरो मॉडेलर डॉ. राजेश जोशी यांनी हे अवघ्या तीन ग्रॅमचे हे रबर पॉवर एअरो मॉडेल तयार करून आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.
हे ३ ग्रॅमचे रबर पॉवर्ड फ्री फ्लाईट एअरो मॉडेल साकारण्यासाठी त्यांनी बालसा लाकडाच्या 2 मी.मी. अशा अतिशय पातळ काड्यांचा वापर केला आहे. तसेच अतिशय पातळ अशा मायलार फिल्मचा पखांच्या कव्हरिंगसाठी वापर केला असून खास प्रकारचे १.५ मी.मीचे अतिशय लवचिक असे रबर देखील वापरले आहे.
साडेतीन ग्रॅमचा या पेनी प्लेनला कुठलेही इंजिन नसून रबरच्या माध्यमातून ते उडते. त्याचा आकार १८ बाय २० इंच आहे. शिवाय त्याचे सर्व भाग वेगळे करून ते कुठेही घेवून जाता येते. ७० ते ८० फुटांपर्यंत ते उंच उडू शकणारे हे पेनी प्लेन इंडोरमध्येच ( बंद हॉलमध्येच ) वापरता येतं.
नवव्या वर्गाच्या महेश्वर ढोणे याने साडेतीन ग्रॅमचे एअरो मॉडेल तयार करण्याची किमया साधली आहे. विमानाचे मुलभूत तत्त्व एअरो मॉडेल्समुळे विद्यार्थ्यांना समजू शकतात. एअरो मॉडेलिंगच्या माध्यमातून हेच शिकताना राजेश जोशी यांनी नवनवे अफलातून प्रयोग करताना मोठ्या जिद्दीने या क्षेत्रात आपले करिअर घडवले.