पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेय. राष्ट्रवादीने आता तृतीयपंथी व्यक्तीला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत विचार केलाय. त्यानुसार राज्यात आगामी निवडणुकीसाठी तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे दिली. लोकसभेत नुकतेच तृतीयपंथींच्या संदर्भात ट्रान्सजेंडर पर्सन्स (अधिकारांचे सरंक्षण) विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजूर करण्यात आले. लोकसभेत तृतीयपंथी बिल आणि सरोगसी बिल केंद्रातील सत्ताधारी फार अनुकूल नसताना आम्ही पास करून घेतली, असा दावाही खासदार सुळे यांनी यावेळी केला. अठराव्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उदघाटन पुण्यात झाले. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले.
राष्ट्रवादी पक्षातर्फे आगामी निवडणुकीत एकातरी तृतीयपंथी व्यक्तीला तिकीट दिले जाईल. तसा आग्रहच मी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटल यांच्याकडे धरणार आहे, असं जाहीर वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात केले. दरम्यान, राष्ट्रवादीने प्रथम महिला आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता. तो तडीस नेला. आता तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत पुढाकार घेण्यात आलाय. मात्र, राष्ट्रवादीकडून प्रत्यक्षात अशा व्यक्तीला उमेदवारी मिळणार का, याची उत्सुकता आहे.
दरम्यान, तृतीयपंथींच्या संदर्भात ट्रान्सजेंडर पर्सन्स (अधिकारांचे सरंक्षण) विधेयक मंजूर झाल्याने एखादी व्यक्ती तृतीयपंथी असल्याबाबत जिल्हा स्तरावरील समिती तपासणी करणार आहे. त्यानंतरच तसे प्रमाणपत्र दिले जाईल आणि ती व्यक्ती अधिकृतपणे तृतीयपंथी असल्याचे मानले जाईल. या संदर्भातील तरतुदींना तृतीपंथींनी विरोध केला आहे. आमचे लिंग ठरवण्याचा अधिकार आम्हालाच आहे, आम्ही सांगू तसे समाजाने आम्हाला स्वीकारले पाहिजे, अशी भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली आहे.