दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी बोर्डाकडून नवे नियम जाहीर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावं लागणार आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Updated: Nov 30, 2017, 11:35 AM IST
दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी बोर्डाकडून नवे नियम जाहीर title=

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावं लागणार आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

परीक्षांचे वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ दरम्यान होणार आहे.

परीक्षांचे नवे नियम 

बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. विद्यार्थ्याला परीक्षेला येण्यास एक मिनिटही उशीर झाल्यास खोलीत प्रवेश मिळणार नाही. तसंच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे.

पेपर फुटण्याचे प्रकार

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, येत्या परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

शिक्षकांकडून स्वागत

दरम्यान शिक्षकांनी या नव्या नियमांचं स्वागत केलं आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळ गैरप्रकार करतात, या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असं शिक्षकांचं म्हणणं आहे.