मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढ्यातच पक्षाच्या महिला पदाधिकार्यामधल्या मतभेदांचं प्रदर्शन घडलं. इशान्य मुंबईमधल्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली गटबाजी शिवसेनाभवनासमोरच चव्हाट्यावर आली. इशान्य मुंबईच्या महिला विभाग संघटक संध्या वढावकर यांच्या कार्यशैलीवर मुलुंडच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. पदांवरून वाद आणि अंतर्गट गटबाजी हे शिवसेनेसाठी नवीन नाही. याचे तोटे शिवसेनेला याआधी भोगावे लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख बैठक संपवून शिवसेना भवनातून बाहेर पडत असताना ईशान्य मुंबईच्या महिला शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला.
आपलं गाऱ्हाणं उद्धव ठाकरेंसमोर मांडण्याचा या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. ठाकरे यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली आणि वाद सोडवण्याची जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली. मात्र उद्धव ठाकरे निघून गेल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये शिवसेनाभवनाच्या दारातच जुंपल्याचं पहायला मिळालं.