Akola Dispute : अकोला (Akola News) शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. तर मोठ्याप्रमाणत दगडफेक (stone pelting) देखील करण्यात आली आहे. या दंगलीत दोन्ही गटांमधील 10 जण जखमी झाले आहेत. तसेच दोन पोलीसही जखमी झाले आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याचं म्हटलं जात आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळे संपूर्ण गोंधळ झाल्याचे म्हटलं जात आहे. एका वादग्रस्त पोस्टवरून झालेल्या गदारोळात दोन गटात जोरदार दगडफेक झाली. यानंतर पोलिसांनी (Akola Police) 26 आरोपींना ताब्यात घेऊन अकोला शहरातील अनेक भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री एका सोशल मीडिया पोस्टमुळे या वादाची ठिणगी पडली. पोस्टवरुन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेला जमाव हिंसक झाला आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जमाव आल्याने प्रचंड प्रमाणात दगडफेक सुरु झाली. रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अनेक भागात कलम 144 लागू केले आहे.
अकोल्यात दोन गटामध्ये झालेल्या वादावर पोलिसांनी सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून शहरातील रामदास पेठ, सिटी कोतवाली, डाबकी रोड, आणि जुने शहर भागात संचारबंदी लावण्यात आली आहे. या दंगलीत सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड केली असून आतापर्यंत 26 जणांना ताब्यात घेतलं आहे.
#WATCH | Maharashtra: Section 144 imposed in Akola following a violent clash between two groups over a minor dispute in the Old City police station area of Akola yesterday; morning visuals from the spot
"Some Vehicles have been damaged by the violent mob. The situation is now… pic.twitter.com/6ZNokV0lVA
— ANI (@ANI) May 14, 2023
एकाचा मृत्यू
अकोला पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी सांगितले की, हा संपूर्ण वाद सोशल मीडिया पोस्टवरून सुरू झाला. त्यानंतर झालेल्या राड्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झालेत. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले. इंस्टाग्रामवर एका पोस्टवरून झालेल्या वादात एका ग्रुपने आधी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवली. मात्र यावेळी जमाव अनियंत्रित झाला. जमावाने तोडफोड सुरू केली. काही वेळाने दुसऱ्या गटानेही रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद पेटला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. मृताच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल केले आहेत.
"अकोला शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पूर्णपणे शांतता आहे. बाहेरच्या जिल्ह्यातूनही पोलीस दल मागवण्यात आले आहे. पूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली आहे. सर्वांनी शांतता ठेवावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठलीही बातमी मिळाली की आमच्यासोबत संपर्क करा. या घटनेमध्ये झालेल्या नुकसानीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलीस कर्मचाऱी जखमी झाले आहेत. त्यामुळे अफवा पसरवू नका आणि पसरवणाऱ्यांना मदत करु नका," असे आवाहन अकोला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले आहे.