गडचिरोली : गडचिरोलीत जिल्हा पोलीस आणि सीआरपीफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा घातपात उधळून लावला आहे.
धानोरा तालुक्यातील जांबिया गावाजवळ गस्त करून पोचलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना एका पुलाच्या शेजारी वीजतार आढळून आली. तातडीने घटनास्थळाला घेराव करण्यात आला.
या स्थळाची बारकाईने पाहणी केल्यावर रस्त्याच्या मधोमध एक भूसुरुंग पेरून ठेवल्याचे स्पष्ट झाले. पोलीस दलाच्या बॉम्बशोधक-नाशक पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. हा भूसुरुंग यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला.
एका स्टीलच्या डब्यात १५ किलो स्फोटके साठवून त्याचा बॅटरी सेलच्या साहाय्याने दूरवरून स्फोट घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट होता. मात्र सतर्क जवानांनी तो उधळून लावला.
बॉम्बशोधक-नाशक पथकाने नंतर नियंत्रित स्फोट घडवून आणत हा भूसुरुंग निकामी केला. अत्यंत शक्तिशाली स्फोटके वेळीच शोधू शकल्याने गडचिरोलीत मोठी घातपाताची घटना टाळली गेली आहे.