मुंबई : प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस प्रवक्ता पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीत हा प्रवेश झाला. महिलेचा सन्मान हा खूप महत्त्वाचा असतो. मी आत्मसन्मानासाठी काँग्रेस पार्टी सोडली असून विचारपूर्वकच शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. लवकरच त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार जबाबदारी दिली जाईल. मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात त्या शिवसेनेसाठी काम करतील असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
प्रियांका चतुर्वेदी या गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षात कार्यरत होत्या. त्यांनी पार्टीच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी देखील संभाळली होती. 2008 पर्यंत मी मुंबईत नोकरी करत होते. 26/11 नंतर मी समाज कार्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून मुंबईतली सुरक्षा मी पाहिली आहे. मुंबईत स्वातंञ्य आहे. मुंबईसारखी दहा शहरं मला बनवायची असल्याचे चतुर्वेदी म्हणाल्या. मुंबईतील समस्या,महिलांच्या समस्यांवर विचार केला, म्हणून मी मुंबईत परतण्याचा विचार केला. त्यामुळे शिवसेनेहून अधिक योग्य पक्ष कोणता आहे. महिला म्हणून सन्मान मिळणं महत्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या अपमानजनक वागणुकीमुळे त्या नाराज होत्या. काही दिवसांपूर्वी त्या मथूरामध्ये असताना राफेल प्रकरणी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका यांच्या समोरच मारहाण केली होती. यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस कमेटीने कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई केली. पण त्यानंतर काही कारणामुळे त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. आणि केवळ तंबी देऊन सोडण्यात आले. या सर्व प्रकरणावर प्रियंका यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भातील उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे पत्र प्रियंका यांनी पोस्ट केले आहे.