पुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस

Pune News : गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या घडामोडींमध्ये नकळतपणे पुण्याचं नाव आता पुढे येत असून, या पुण्यात दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यानं चिंता वाढू लागली आहे.   

सागर आव्हाड | Updated: Jan 17, 2024, 08:01 AM IST
पुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस  title=
Pune crime news one more goon killed CCTV video went viral

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : (Pune News) पुण्यात आणखी एका गुंडाला संपवल्याची घटना घडली असून, या घटनेमुळं आता पुन्हा एकदा गुन्हेगारी जगताचा सुळसुळाट असणाऱ्या पुण्यानं अनेकांनाच धडकी भरवली आहे. पुण्यातील लष्कर परिसरात नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे आणि ऐवज लुटणाऱ्या एका सराईत गुंडाला बहिणीची छेड काढल्यामुळं तरुणीच्या भावानं दोन मित्रांच्या साथीनं त्याचा खात्मा केला. CCTV मुळं ही संपूर्ण घटना उघडकीस आली. 

गुंडाच्या नावे 25 गुन्ह्यांची नोंद 

अरबाज बबन शेख असं या मृत सराईत गुन्हेगाराचं नाव, त्याच्या नावे तब्बल 25 गुन्ह्याची नोंद असून, तो नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. असं असूनही त्याच्या वर्तणुकीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्याने लोकांना त्रास देणं सुरुच ठेवलं होतं. 

हा अरबाज बबन शेख पुण्याच्या भवानी पेठेतला रहिवाशी होता. सदरील परिसरातील गल्लीत त्याची अन् त्याच्या कुटुंबाची दहशत होती. तो लोकांना मारहाण करायचा, त्यांच्या खिशातील पैसे काढून घ्यायचा. विक्रेत्यांच्या वस्तू उचलून घेऊन जायचा. भवानी पेठ आणि कॅम्प भागातील विक्रेत्यांवर तो दादागिरी करायचा. गाड्यांवर मोफत खाणे, विक्रेत्यांकडील वस्तू जबरदस्तीने उचलून नेणे असे प्रकार तो करत होता. त्याच्या दादागिरीला परिसरातील सगळेच वैतागले होते. समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात त्याच्यावर 25 गुन्हे दाखल होते अशी माहितीसुद्धा समोर आली आहे. 

पुण्यातील या गुंडाविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करुन त्याला स्थानबद्ध केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली होती. पण, सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यातच त्याने एका तरुणीची छेडही काढली होती. त्यामुळे संतापलेल्या या तरुणीच्या भावाने दोन मित्रांसह कट रचला आणि त्याचा खून केला. निर्धावलेला अरबाज शेख कोणालाही जुमानत नव्हता. 

हेसुद्धा वाचा : Iran Attack Pakistan: पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा 

गुन्हा केला की तुरुंगात जायचा, बाहेर आल्यानंतर परत दादागिरी करायचा. यामध्ये त्याचे कुटुंबीय हे देखील त्याला साथ देत होते. त्याने आरोपी जगदीश दोडमनीच्या बहिणीची छेड काढली आणि त्याचा संताप अनावर झाला. शेखचा खात्मा केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि हे प्रकरण समोर आलं. दरम्यान सध्या पोलीस या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पुणे शहर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.