रत्नागिरी : सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
संगमेश्वरमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. शहरातल्या आठवडा बाजारात पुराचं पाणी शिरलंय. शास्त्री नदीला पूर आल्याने संगमेश्वर बाजारपेठेला धोका निर्माण झालाय. तर फणगूसमध्येही पाणी भरण्यास सुरुवात झाली. संगमेश्वरात याच पार्श्वभूमीवर तलाठी कार्यालयाने व्यापाऱ्यांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्यात. गडनदीला पूर आल्याने माखझन कासे रस्त्यावर चार फूट पाणी साचलंय. त्यामुळे सात गावांचा संपर्क तुटलाय.
पुरामुळे माखझन कासे पुलाला धोका निर्माण झालाय. कासे, माखझण, नारडुवे, असावे, कळंबुशी अशा सात गावांचा संपर्क यामुळे तुटलाय. खेड शहरातील जगबुडी नदीचं बाजारात घुसलेलं पाणी ओसरलंय. मात्र खेड शहरात धुवाधार पाऊस पडतोय. त्यामुळे खेड शहराला अजूनही पुराचा धोका कायम आहे.
दरम्यान, चिपळूण बाजारपेठेत केव्हाही पाणी घुसू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे धोक्याचा इशारा चिपळूण नगर परिषदेने दिला. अनेक दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपला माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली होती.