रत्नागिरी : येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी आता चुरस पाहायला मिळत आहे. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आमदार उदय सामंत यांचे वर्चस्व राहिले आहे. नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. अडीच वर्ष पद सामंत गटाकडे होते. आता पुढीची टर्म आमदार राजन साळवी गटाकडे आहे. त्यामुळे साळवी गटाचीही कसोटी आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने जोर लावला आहे. राज्यपातळीवरचे नेत्यांनी शहरात ठाण मांडले होते. शिवसेना-भाजची युती तुटल्यानंतर भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याची संधी साधण्याचा प्रयत्न करत आहे. काही करुन नगराध्यक्षपद पदरात पाडून रत्नागिरीत भाजपची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भाजपने उराशी बाळगले आहे. मात्र, आमदार सामंत हे तालुक्यात एकहाती सत्ता काबीज करण्यात माहीर आहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यामाध्यमातून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा जोरदार आहे.
शिवसेनेकेडून बंड्या साळवी हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा आधी शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेला सोपी जाणार आहे. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी करण्यावर भर दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक पटवर्धन यांच्यासाठी प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला दिग्गजांना भाजपने उतरवले आहे. यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे असे अनेक दिग्गज या रॅलीत उतरले होते. या शिवाय भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसेच नारायण राणे ही सभा घेण्याची शक्यता आहे. या प्रचार फेरीच्या दरम्यान भाजप नेत्यांनी नागरिकांशी संपर्क साधून पटवर्धन यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीची कधी नव्हे इतकी चर्चा सुरु झाली आहे.
स्थानिक पातळीवर प्रथमच भाजपने दिग्गज नेत्यांना उतरविल्याने चर्चा रंगत आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मात्र, आमदार उद्य सामंत आणि आमदार राजन साळवी यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचा मोठा नेता रत्नागिरीत फिरकलेला नाही. त्यामुळे भाजपने एवढी ताकद दाखविल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.