अरुण मेहेत्रे, प्रतिनिधी, झी मीडिया पुणे : पुण्यामधले टोयोटा वाहनधारक सध्या एका वेगळ्याच समस्येनं त्रस्त आहेत. ही समस्या आहे त्यांच्या गाडीच्या सर्व्हिसिंगची.
टुरिस्टचा व्यवसाय असलेल्या किरण पासलकर यांनी दोन महिन्यांपूर्वीच नवी इनोव्हा गाडी विकत घेतली. मात्र गाडीच्या पहिल्यावाहिल्या सर्व्हिसिंगासाठी त्यांना थेट मुंबई गाठावी लागली. कारण पुण्यात टोयोटा गाड्यांच्या सर्व्हिसिंगची पुरेशी सोयच उपलब्ध नाही.
पुण्यात टोयोटाच्या सर्व्हिसिंगसाठी गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागतात. शहरातलं बावधन आणि हडपसरमधलं सर्व्हिस सेंटर बंद झाल्यानं सगळा भार भोसरीतल्या एकाच सेंटरवर आलाय. त्यामुळे २-३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर इथं सर्व्हिसिंगसाठी नंबर लागतो. म्हणून सर्व्हिसिंगसाठी लागणारा दीर्घ कालावधी वॉरंटी पिरिअडमध्ये वाढवून देण्याची मागणी होत आहे.
पुण्यात टोयोटा गाड्यांची संख्या ४० हजारांवर आहे. गाडी कुठलीही असली तरी तिची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग अत्यावश्यक असते. त्यामध्ये टोयोटा कमी पडत असल्यानं त्याचा नाहक मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागतोय. येत्या २ महिन्यांत टोयोटाच्या सर्व्हिस सेंटर्सची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र त्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.