शिर्डी : साईबाबांच्या (Shirdi SaiBaba) भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे. यामुळे आता भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला हाताने स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. (shirdi sai sansthan give decision to remove the glass in front of sai babas mausoleum)
शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता समाधी समोरील काचा आणि जाळी हटवण्यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत. व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तसंच साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करता येणार आहे.
साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचांमुळे भक्तांना समाधीला स्पर्श करुन दर्शन करता येतं नव्हतं. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. मात्र या काचांमुळे दर्शन घेता येत नसल्यामुळे नाराजी आणि संताप होताच. मात्र मंदिर संस्थान प्रशासनाने घेतल्या या निर्णयाने आता पुन्हा एकदा बाबांच्या भक्तांना थेट समाधीचं दर्शन घेता येणार आहे.