नाशिक : हॉटेल परमिट रुम केल्यास व्यवसाय वाढतो असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराब पाटील यांनी केले आहबे. परमिट रुममुळे माझा व्यवसाय वाढल्याचे ते म्हणाले. युवकांना रोजगारासंदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले.
जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्याचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी बेरोजगार तरुणांसमोर मार्गदर्शन करताना हॉटेल ला परमिट रूम केल्यास चार पटीने जोरात चालतंय असे धक्कादायक वक्तव्य केले आहे.
मी स्वतः हॉटेल भाड्याने घेतली होती नंतर ती विकत घेतली. मी तिला शुद्ध शाकाहारी म्हणून चालवली तर ती चालेना. मग तिला मांसाहारी केली. पण मटण उरलं की दुसर्या दिवशी खपे ना. अखेर मी तिला परमिट रूम केली मग ती हॉटेल जोरात चालू लागली.
मांसाहारी हॉटेलचा गल्ला 4 हजार रुपये होता तोच परमीटरूम ज्या दिवशी सुरू केले त्यादिवशी 20 हजार रुपये धंदा झाला. सुरुवातीला मला असे वाटले आपण हॉटेलचा व्यवसाय चालत नव्हता तेंव्हा असे वाटले आपण फसलो. पण एकाने सांगितले की परमिट रूम चालू कर आणि महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मिळायला लागले. असे धक्कादायक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी सुशिक्षित बेरोजगार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केली आहे.
बेरोजगारांना मुद्रा कर्ज मिळत नाही आणि मिळालं तरी त्यांना ते फेडता येत नाही. या पार्श्वभुमीवर प्रामाणिक धंदा करावा हे स्पष्ट करताना त्यांनी हे उदाहरण दिले. बेरोजगार युवकांना व्यवसायाचे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ते बोलत होते. पण आपण त्यांचे उदाहरण चुकल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.