Uddhav Thackeray on Maharashtra Government: जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला असून, त्याचा सूड मी घेणारच अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जाहीर इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित कामगार सेना सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचं काम गार करणारं सरकार आहे असा टोलाही लगावला आहे. तसंच आपण जो प्रसाद देऊ तो आयुष्यभर लक्षात राहील असाही इशारा दिला.
आपलं सरकार असताना आपण 25 हून अधिक उद्योग आणि अडीच लाख कोटींहून अधिक गुंतवणूक आणली. मात्र आता शेपट्या घालून बसणारे हे उद्योग बाहेर नेत आहेत. उद्योग शेजारच्या राज्यात असतानाही यांच्या शेपट्या बाहेर येत नाहीत अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बारसू रिफायनरीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पत्र लिहिलं होतं अशी कबुली यावेळी त्यांनी दिली आहे. दरम्यान तेथील लोकांशी संवाद साधत, त्यांना रोजगार दिला जावा असंही ते म्हणाले आहेत. "मी पत्र दिले होते, पण मी अडीच वर्षात पोलीस बळाचा वापर करून तिथे गेलो नाही. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी थांबवून ठेवले होते. उद्धव ठाकरेंचं इतकं ऐकता तर मग सरकार कशासाठी पाडलं? आरे, कांजूरचा निर्णय का रद्द केला? बुलेट ट्रेनने रोज कितीजण अहमदाबादला जाणार आहेत? नाणार, बारसूची भूमिका माझी नाही, तर तिथल्या लोकांची भूमिका होती," असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी अडवले होते, यापुढेही अडवणार असा इशाराच उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
"मुख्यमंत्री झाल्यावर प्राथमिक अहवाल घेतला. नाणारचं जिथे स्वागत होत असेल तिथे न्या असं मी सांगितलं होतं. बारसूमध्ये लोकांची संमती असल्याचं मला सांगण्यात आलं होतं. पण जर हिताचा प्रकल्प असेल तर जबरदस्ती कशासाठी केली जात आहे? एखाद्याच्या टाळक्यात काठी मारुन हा प्रकल्प चांगला आहे असं का सांगितलं जात आहे. प्रकल्पाबद्दलचे सत्य समजलेच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पूजा झाली असेल तर सांगावे," अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. एवढं असताना शेतात स्ट्रॅाबेरी बघत फिरतात असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
लोकांच्या मनातील संशय दूर करा, मग लोकांना रोजगार द्या व नंतर प्रकल्प राबवा असा सल्लाच यावेळी त्यांनी दिला.