अमरावती : परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा तडाखा अनेक घरांना बसला. तसेच अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील दिवानखेड येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी वीज पडून श्रीरंग औरंगपुरे या पशुपालकाच्या दोन म्हशी, एक रेडा आणि एक वासरु अशी चार जनावरे मृत्युमुखी पडली. शेवती शेतशिवारात ही जनावरे चरण्याकरिता गेली होती. दरम्यान सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यात औरंगपुरे यांच्या जनावरांवर वीज कोसळली.
अचानक झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामस्थांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पशुपालकांची जनावरे मृत्युमुखी पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. पालम, पाथरी पूर्णा परभणी तालुक्यातील अनेक गावांतील घरावरचे पत्रे उडून गेली,झाडे उन्मळून पडली तर दुष्काळात कसे बसे वाचवलेले पीक ही कोलमडून गेलीत. पाथरी तालुक्यातील बाबुलतार या गावात मोठं नुकसान झालं, या वादळी वा-यांत अनेकांची घरे पडली त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आल्याच बघायला मिळाले. घरातील धान्य संसारोपयोगी साहित्य पावसाने भिजून खराब झाले. घरात पाणी साचल्याने घरांच्या भिंती पडल्या तर अनेक घरावरील पत्रे या वादळात उडून गेली.
विष्णू देवराव थिटे या अल्पभूदारक शेतकऱ्याच्या दोन एकर केळी बागेतील तबल अडीच हजार केळीची झाडे आडवी झाली आहेत, विजेचे खांब ही कोसळून पडल्याने अनेक गावांना आपल्या रात्रा अंधारात काढाव्या लागणार आहेत,झालेल्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांना मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्थाकडून केली जात आहे.