ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचं रास्तारोको

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेलं पानगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

Updated: Mar 10, 2021, 02:20 PM IST
ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचं रास्तारोको title=

शशिकांत पाटील, झी २४ तास, लातूर  : लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेलं पानगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. पानगाव येथील १० वर्षीय निखिल पांचाळ या विद्यार्थ्यांचा ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे आज सकाळी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पानगाव बंदची हाक दिली. तसेच मृत निखिल पांचाळ याचा मृतदेह घेऊन रास्ता रोको आंदोलन सुरु केलं. 

पानगावच्या रस्त्यात खड्डेच खड्डे असून सिमेंटचा ट्रक घेऊन इतक्या अवजड वाहनांना प्रवेशच का दिला जातो असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उभा केला. वडीलांचे छत्र हरवलेला मयत निखिल पांचाळ हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. 

त्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी जो पर्यंत घटनास्थळी भेट देऊन अशा घटनांची पुनरावृत्ती होणार याची लेखी हमी दिल्याशिवाय प्रेत उचलणार नसल्याची भूमिका नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतली होती. 

दरम्यान या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर रीतसर गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.