वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या बारामतीमधून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक जिंकली. पण आता मात्र त्यांनी बारामतीऐवजी वेगळ्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यात संधी मिळाली तर वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली. त्याचवेळी आपण सध्या तरी असा विचार करत नाही, तुम्ही चिंता करु नका, असं सुप्रिया सुळेंनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांना आश्वस्त केलं.
वर्ध्यातील पवनार आणि सेवाग्राम आश्रम आणि येथे असलेला गांधी सहवास यामुळे आपण वर्ध्याच्या मोहात आधीपासूनच पडलो असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. तसंच वयाची ६० वर्ष पार केली तर महिन्यातले १० दिवस पवनार आश्रमात देणार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'माझी राजकारणात आणि समाजकारणात जी काही ओळख आहे ती बारामतीमुळे आहे. मी हे बोललेलं बारामतीकरांना आवडणार नाही, पण जर कधी चॉईस करायची वेळ आली आणि बारामतीमधून दुसरा खासदार उभा राहिला तर मला आवडणारा जिल्हा आणि मतदारसंघ वर्धा आहे,' असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं.
विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनांचे उद्घाटन, सुप्रिया सुळेंनी केलं. वर्ध्यात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, आमदार पंकज भोयर आणि आमदार दीपकराव दौंदल उपस्थित होते.