नितेश महाजन, झी मीडिया, जालना : नाफेडने यावर्षी देखील तूर खरेदी सुरु केली आहे. यंदा नाफेडकडून तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव दिल्या जातोय. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. नाफेडने तूर खरेदी सुरु करण्याआधी व्यापाऱ्यांनी मनमानी भावाने तूर खरेदी सुरु केली होती. त्यामुळे नाफेडच्या तूर खरेदीमुळे व्यापाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय.
८ फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातलं नाफेडचं पहिलं तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने व्यापाऱ्यांना चांगलाच चाप बसलाय. नाफेडचं हे खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावर्षी नाफेडने तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केल्याने व्यापाऱ्यांचा बुरखा फाटलाय. हे केंद्र सुरु होण्याआधी शेतकऱ्यांची तूर व्यापाऱ्यांनी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये एवढ्या कमी दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता व्यापाऱ्यांकडे पाठ दाखवत नाफेडकडे तूर विक्रीसाठी गर्दी केलीय.
जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर लागवड झालीय. परिणामी उत्पादन देखील चांगलं येण्याची शक्यता पाहता नाफेडने यावर्षी प्रतिक्विंटलला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला. आतापर्यंत फक्त जालना तालुक्यात दीड हजारावर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केलीय. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे तूर विक्रीसाठी शेतकरी पाठ दाखवतायत.
नाफेड हे शासनाचं खरेदी केंद्र आहे. या केंद्रामुळेच शेतकऱ्यांना यंदा आधार मिळालाय. यापुढे देखील व्यापाऱ्यांच्या मनमानी पध्दतीने होणाऱ्या खरेदीला चाप बसण्यासाठी अशी प्रत्येक शेतमालाची खरेदी केंद्र सुरु करावीत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.