Maharashtra Russia Connection : जगाच्या पाठीवर रशिया हा देश सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरतोय. युक्रेनसोबत सुरू असणारं युद्ध असो किंवा मग अगदी जन्मदरवाढीसाठी या देशात सुरू असणारे प्रयत्न असो. रशियाची ही अशी चर्चा सुरू असतानाच आता याच देशाशी एका वेगळ्या आणि काहीशा खास कारणानं असणारं महाराष्ट्राचं कनेक्शनही नुकतंच समोर आलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे व्हायरल होणारं एक Reel.
सोशल मीडियावर दर दिवशी कैक रील व्हायरल होत असतात. पण, vaicharikkida या पेजवर एका मुलाखतीतील दर्जेदार माहितीचा तुकडा शेअर करत काही सेकंदांमध्ये सर्वांचं लक्ष वेधण्यात आलं आहे. ही माहिती आहे एका अशा प्रोडक्टची, जिचा वापर इथं तर अनेकजण करतात. पण, सातासमुद्रापार रशियातही या प्रोडक्टला कमालीची लोकप्रियता आहे.
हे प्रोडक्ट म्हणजे मराठमोळ्या व्यक्तीनं सुरू केलेलं कैलास जीवन. बहुविध कारणांसाठी वापरात येणारं कैलास जीवन हे मलम अगदी रशियामध्येही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. खुद्द कैलास जीवनचे संचालक परेश कोल्हटकर, यांनी vaicharikkida शी संवाद साधताना याबाबतच्या माहितीवरून पडदा उचलला.
कोल्हटकर याविषयी माहिती देत म्हणाले, 'गोव्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात जवळपास 70 टक्के रशियन पर्यटक भेट देतात. तिथं रशियन पाट्याही दिसतात. इतकंच काय तर, हॉटेलांमध्ये रशियन नॉवेलही दिसतात. याचं निरीक्षण केल्यानंतर कंपनीनंरशियन भाषेतील पॅम्प्लेट काढले.'
कोल्हटकर यांच्या माहितीनुसार त्यांचा पोलिश वितरक (Polish Distributer) गोव्यात राहतो. रशियात हे ट्रेडमार्क रजिस्टर, तिथं त्यांचा एक इंपोर्टरही आहे जो 8 -10 उत्पादनं खास भारतातून मागवतो. एकदा तिथं तो एक जागा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी म्हणून गेला. जागा देणाऱ्या व्यक्तीनं ती नेमकी कशासाठी हवी आहे, याबाबतचा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर आपल्याला कैलास जीवन मागवायचं आहे, असं खरं कारण वितरकांनी सांगितलं. कारण करताच त्या माणसानं आपण ही जागा 10000 रुबल कमी घेऊन भाड्यानं द्यायला तयार आहोत असं थेट सांगितलंय. वितरकांनं यामागचं कारण विचारलं असता, 'मी गेली 30 वर्ष कैलास जीवन वापरतोय, तू चांगलं प्रोडक्ट आणतोयस' असं म्हटलं.
रशियामधील ही लोकप्रियता हीच या प्रोडक्टची ताकद आहे असं सांगत कोल्हटकर यांनी कौतुकानं हे रशिया कनेक्शन जगापुढे आणलं. सध्या कैलास जीवनच्या रशिया कनेक्शनवरून पडदा उचलणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनाही ही बाब कौतुकास्पट वाटतेय असं म्हणायला हरकत नाही.