World Top 10 Cities With Slowest Traffic: वाहतुककोंडी आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे, असं तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी वाटलं असेल. आपल्यापैकी अनेकजण कधी ना कधी अती भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर होणाऱ्या चिडचिडीमधून गेले असतील. मात्र जगातील सर्वाधिक वाहतूककोंडी असणारी शहरं कोणती असं विचारल्यास तुम्ही भारतातील मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु, कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांची नावं घ्याल. मात्र सर्वात मंद गतीने हलणारी वाहतूक असलेली शहरांच्या यादीत वरीलपैकी एकही शहर नाही. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील एक अगदीच अनपेक्षित शहराचं नाव आहे. तर भारतामधील एकूण 3 शहरं टॉप 10 मध्ये आहेत.
जगातील सर्वात संथ गतीने वाहतूक होत असलेल्या अव्वल 10 शहरांची यादी अमेरिकेतील एका बिगसरकारी संघटनेनं यादी तयार केली आहे. या अहवालामध्ये भारतामधील पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता, बिहारमधील आरासहीत महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. महाराष्ट्रातील जे शहर या यादीत आहे त्याचं नाव आहे भिवंडी! नॅशनल ब्यूरो ऑफ इकनॉमिक रिसर्च (एनबीईआर) या संस्थेनं जगातील 152 देशांमधील 1,200 हून अधिक शहरांचा अभ्यास करुन ही यादी तयार केली आहे. या अहवालामध्ये अमेरिकेतील फ्लिंट शहरातील वाहतुकीचा वेग फारच संथ असल्याचं म्हटलं आहे. तसेच बांगलादेशची राजधानी ढाकामधील वाहतुकीही फारच संथ गतीने हलते असं म्हटलं आहे. कोलंबियामधील बोगोटो हे शहर सर्वाधिक गर्दी असलेलं आणि वाहतूक संथपणे चालणारं शहर आहे.
सर्वाधिक संथ वाहतूक असलेल्या शहरांच्या यादीमध्ये भारत, बंगलादेश आणि नायझेरियामधील अनेक शहरांचा समावेश आहे. सर्वात संथ वाहतूक असलेल्या शहरांमध्ये भिवंडी 5 व्या स्थानी, कोलकाता 6 व्या स्थानी आणि आरा 7 व्या स्थानी आहे. या यादीमध्ये 11 व्या स्थानी बिहार शरफी शहर असून मुंबई 13 व्या स्थानी आहे. आइजोल शहर 18 व्या स्थानी असून बंगळुरु शहर 19 व्या स्थानी आहे. शिलाँगचा समावेशही अव्वल 20 शहरांमध्ये आहे.
गाड्या आणि माणसांची सर्वाधिक गर्दी असलेल्या शहरांमध्ये बंगळुरु 8 व्या स्थानी, मुंबई 13 व्या तर दिल्ली 20 व्या स्थानी आहे. हा अहवाल 12 जून ते 5 नोव्हेंबर 2019 दरम्यान गुगल मॅप्सच्या आकडेवारीच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.