औरंगाबाद: सरकारी शाळांमधून खास करून जिल्हा परिषद शाळांमधून हायटेक शिक्षण देण्याचे ढोल बडवले जात असतात. मात्र, याच शाळांना वीज बिल भरण्यासाठी कुठलाही निधी मिळत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शाळांची वीज तोडण्यात आली होती. या संकटात औरंगाबादमध्ये महावितरण मदतीसाठी धावून आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोपाळपूर गावची ही जिल्हा परिषद शाळा. प्रोजेक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातायत. आयएसओ मानांकन प्राप्त या शाळेत काही दिवसांपूर्वी अंधार पसरला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद झालं होतं. २० हजाराचं विज बिल न भरल्याने या शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शाळेत वीज नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडलं होतं. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा एक दिवसाचा पगार देऊन शाळेचं थकीत बिल भरलंय. फक्त याच शाळेचं नाही तर अशा ३५ शाळांचं थकीत वीज बिल भरुन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ९४३ शाळांकडे थकीत विज बिलाचा आकडा 20 लाखांच्या घरात आहे. शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी फक्त साडेसात हजारांचा तोकडा निधी मिळतो. त्यात इतर खर्चातच निधी खर्च झाल्यानं विज बिल भरायला निधीच उरत नाही.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे तुर्तास हा प्रश्न सुटला आहे. मात्र, भविष्यात असाच कारभार राहिल्यास ही परिस्थिती पुन्हा ओढवेल. एकीकडे सरकार हायटेक शिक्षणावर भर देत असताना मुलभूत गरज असलेल्या वीजेचीच वानवा आहे. त्यामुळे सरकारी धोरणे नक्की कोणत्या मार्गाने चालली आहेत, असा सवाल अनेकांकडून व्यक्त होत आहे.