बीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?

बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 7, 2025, 08:35 PM IST
बीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का? title=

Beed Guardian Minister : सध्या राज्यात पालकमंत्रिपदाचं वाटप कधी होणार यावर बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मुंडे भाऊ बहिंणींपैकी कुणाकडे तरी पालकमंत्रिपदाची धुरा दिली जाईल अशी अपेक्षा आहे. मात्र याला सुरेश धस यांच्यासह अनेकांनी विरोध केला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर तर विरोध अधिक तीव्र झालाय. धनंजय मुंडेंबाबत नकारघंटा का? पाहुयात सविस्तर

मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही, राज्यातील पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्यापही झाला नाहीये. अशातच बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. गेले अनेक दशकं बीडमध्ये राज्य गाजवणाऱ्या मुंडे घराण्यातील कुणाकडेच हे पद जाऊ नये अशी सुरेश धस यांच्यासह विरोधी नेत्यांची मागणी आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्रिपद देण्यात आलं आहे. मंत्रिपदानंतरही दोघांना पालकमंत्रिपदाची आस आहे. जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या या पदाला जोडलेल्या असल्याने हे पद अतिशय महत्वाच आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे प्रयत्नशील आहेत.

बीडच्या पालकमंत्रीपदावर सुरेश धस काय म्हणाले? 

बीडमधील पालकमंत्रीपदाबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत त्यांनी धनंजय मुंडे नको, पंकजा मुंडे तर नकोच नको असं सुरेश धस म्हणाले. या दोघांपेक्षा बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं, अशी मागणी सुरेश धसांनी केलीये.

तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडे भाऊ बहिणीकडे पालकमंत्रीपद नको. इतर कोणालाही केलं तरी चालेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

बीडमधील हत्या, आरोपांच्या फैरी यामुळे सध्या पालकमंत्रिपद कुणाला द्यायचं याचा गुंता वाढत चाललाय. सरकारमधीलच एका आमदाराने मुंडेच्या पालकमंत्रिपदाला इतका विरोध केलाय. त्यामुळे सरकारदेखील आता कोंडित सापडलंय. आता यातून काय मार्ग निघतो आणि पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहावं लागेल.