Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) बिनसलं आणि सेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी (Congress-NCP) हातमिळवणी केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करून राज्यात अडिच वर्ष सत्ता स्थापन केली. भविष्यात आघाडी कायम ठेवण्याचा निर्धारही या तिन्ही पक्षांनी केला. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि 40 आमदारांसहे ते शिवसेनेतून बाहेर पडले. यानंतर मविआ सरकार कोसळलं आणि शिंदे गटाने (Shinde Group) भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली.
राष्ट्रवादीने शिवसेना फोडली
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यापासून शिंदे गटाच्या आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसंच पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना फुटली असा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. आता तर नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तर नवल वाटायला नको असं भाकीत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) हे भाकित वर्तवलंय. राष्ट्रवादीनेच शिवसेना फोडली असा आरोपही केसरकरांनी केला.
'शिवसेना मजबूत करु'
मराठीचा अभिमान आहे म्हणूनच आम्ही शिवसेनेत गेलो, युतीसोबत असताना ज्या लोकांनी आम्हाला मतदान केले त्यांच्यासाठी आमचं भांडण आहे, असं केसरकर यांनी म्हटलं. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचं होते तर राजीनामा देऊन निवडणूक का लढवली नाही असा सवाल दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता उपस्थित केला. तसंच आम्ही युती मधूनच निवडून आलेलो आहे शिवसेना म्हणून आलेलो नाही, असंही केसरकर म्हणाले. राष्ट्रवादीचं शिवसेना फोडण्याचं स्वप्न पूर्ण झालं असेल पण आम्ही शिवसेना एवढी मजबूत करू की उद्या राष्ट्रवादी फुटली तरी तुम्हाला आश्चर्य वाटायची गरज नाही, असा सूचक इशारा केसरकरांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले तर नवल वाटायला नको असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. त्यामुळे शिंदे गटाचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी आहे का या चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे केसरकरांच्या भाकितावर राष्ट्रवादीनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना फोडली की दीपक केसरकर आणि त्यांच्या कंपूने शिवसेना सोडली असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला आहे. तसंच चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा दीपक केसरकर यांनी अभ्यास करावा असा सल्लाही जयंत पाटील यांनी दीपक केसरकर यांना दिला आहे.
पुढचं टार्गेट राष्ट्रवादी?
काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून शकतो असं सूतोवाच केला होता. शिवसेना हा मोठा पक्ष होता, त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून तो पक्ष फोडण्यात आला, आता त्यांचं दुसरं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो, कारण शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.