मुंबई : पारनेरमधल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. या ५ नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवारांना फोन करून या ५ नगरसेवकांना परत पाठवायला सांगितलं होतं. या पक्ष प्रवेशामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याची माहितीही समोर आली. अखेर बुधवारी या पाचही नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशावरून झालेल्या या वादावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी बारामतीमध्ये होतो, तिथे पारनेरचे आमदार निलेश लंके आले. त्यांनी काही अपक्ष नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचे आहे, असं सांगितलं. पण हे नगरसेवक शिवसेनेचे होते, हे मला नंतर कळालं. याबाबत विचारणा केली असता ते भाजपमध्ये जात होते, असं सांगण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले.
आम्ही आघाडीमध्ये एकत्र होतो, तेव्हा एकमेकांचे सदस्य फोडायचो नाही. आता तीन पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी फोडू नयेत, म्हणून मी निलेश लंकेला बोलावलं. मुख्यमंत्री नाराज नव्हते, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.