मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान मतदार संघ व मतदार संख्या यात मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. याबाबतच्या मतदार नोंदणीची आकडेवारी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ७२ लाख ६३ हजार २४९ इतकी मतदार संख्या आहे. यात ३९ लाख ४७ हजार ३८५ पुरुष, तर ३३ लाख १५ हजार ३३६ महिलांचा समावेश आहे. ५२८ इतर मतदारांचा समावेश आहे.
मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत १ लाख १५ हजार ५९० मतदारांची वाढ झाली आहे.
महिला मतदारांच्या संख्येत १.७८ टक्के तर पुरुष मतदारांच्या संख्येत १.४८ टक्के वाढ झाली आहे.
२६ मतदार संघापैकी सर्वाधिक ३ लाख ७९ हजार २७९ मतदार हे चांदिवली मतदार संघात आहेत. गोरेगांव मतदार संघात ३ लाख २७ हजार ८९९ तर अंधेरी पश्चिम मतदार संघात ३ लाख ३ हजार २११ इतकी मतदारांची संख्या नोंदवण्यात आली आहे.
विक्रोळी मतदार संघात सर्वात कमी २ लाख ३१ हजार ४७ इतके मतदार असल्याची माहिती समोर आली आहे.
२०११च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या ९३ लाख ५६ हजार ९६२ इतकी होती. यात ५० लाख ३१ हजार ३२३ पुरुष, तर ४३ लाख २५ हजार ६३९ महिलांचा समावेश होता.
२०१९ मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे १ कोटी १ लाख ६३ हजार ४२४ असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.