Bachhu Kadu : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार हा मुद्दा सध्या वादाचा विषय बनला आहे. दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, दिवाळी झालं नविन वर्ष सुरु झालं तर, प्रत्यक्षात मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच आता शिंदे गटाच्या आमदाराने मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच जाहीर केली आहे. एक घाव दोन तुकडे करून टाका असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू(Bachhu Kadu) यांनी यावर प्रतिक्रिया देत आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे बच्चू कडू यांची चिडचिड होत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे.
20 ते 22 जानेवारी दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू संतापले आहेत. एक घाव दोन तुकडे करून टाका. आमदारांमध्ये आता कुचबुज वाढली, असं ते म्हणाले. विस्तार करायचा नसेल तर तसं स्पष्ट सांगावं, अशी भूमिका आता बच्चू कडू यांनी मांडली आहे.
बच्चू कडू मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. खोक्यांवरील आरोपांमुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद झाला होता. यावेळी बच्चू कडू यांनी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला होता. या वादानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना देखील बच्चू कडू यांनी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. सत्ता स्थापनेपासूनच बच्चू कडू यांना मंत्रीपदाबाबात हुलकावणीच मिळाली आहे. मंत्रीमंडळ विस्तारातही संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. दिव्यांग मंत्रालयाचं मंत्रीपद मिळाले तर आनंद होईल. तळागाळापर्यंत मंत्री म्हणून नाहीतर सेवक म्हणून काम करेल अशी प्रतिक्रिया ते नेहमीच देत असतात.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. खाते वाटप जाहीर करण्यासही शिंदे-फडणवीस सरकारने विलंब केला. यानंतर आता चर्चा रंगलेय ती दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे. संजय शिरसाट यांच्यासह शिंदे गटातील अनेक आमदार तसेच भाजपचे देखील अनेक आमदार मंत्री पदाच्या प्रतिक्षेत आहेत.