दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपाती चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करणारे याचिकाकर्ते पत्रकार बंधुराज लोणे यांनी त्यांच्या याचिकेबाबत पुढील निर्णय हा त्यांच्या वकीलांशी चर्चा केल्यानंतर घेऊ असं म्हटलंय.
न्या.लोया यांचे चिरंजीव अनुज यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. कुटूंबियांना न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत कुठलाही संशय नसल्याचं म्हटलं होते. तसेच न्या. लोया यांच्या मृत्यूवरून सुरु असलेलं राजकारण तातडीनं थांबण्यात यावं असं कळकळीचं आवाहन केलं होतं.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे नाव सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात होते. आणि या प्रकरणाची सुनावणी सीबीआय विषेश कोर्टाचे न्या. लोया यांच्यापुढे सुरू होती. त्यामुळे न्या. लोया यांचा अचानक झालेला मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सुरु झाली होती.
पत्रकार बंधुराज लोणे यांनीही या प्रकरणात मोठ्या वजनदार व्यक्तीचे नाव पुढे आल्यानं त्यातलं सत्य बाहेर येण्यासाठी नि:पक्षपाती चौकशीची मागणी याचिकेद्वारे केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये असलेले आणि उघड झालेले मतभेद तसेच सोहराबुद्दीन चकमक प्रकरणाशी या याचिकेचा कुठलाही संबंध नाहीये असं लोणे यांनी म्हटलं होतं.