मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यात येत्या काही तासांत ढगफुटी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या तीन तासांपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या तीन तासांमध्ये जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच यादरम्यान वीज पडण्याचे प्रमाणही वाढू शकते. कोल्हापूरसह सातारा, सांगली आणि रत्नागिरीतही असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
काही दिवसांपूर्वीच सांगली आणि कोल्हापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती उद्भवली होती. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. तसेच मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली होती. त्यामुळे आता हवामान विभागाच्या अंदाजाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. याशिवाय, उद्या याठिकाणी मतदान कसे पार पडणार, हा प्रश्न यंत्रणांपुढे निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या तालुका नियंत्रण कक्ष, संबंधित अधिकार, कर्मचारी यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही सध्या पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरून पुण्याकडून सातारा, कोल्हापुरकडे जाणारी वाहतुकही मंदावली आहे.
रत्नागिरीमध्येही पावसाचा जोर पकडला आहे. पुण्यातही कालपासून पाऊस होत आहे. रविवारी सायंकाळी पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. मुंबई वेधशाळेने पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.