मुंबई : महाराष्ट्रता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलंय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केलीय. परंतु, सरकार बनवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी अर्थात 'सिल्व्हर ओक'मध्ये दाखल झालेत. थोड्याच वेळात शरद पवार आणि दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात पार पडणार आहे. यावेळी, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आपली भूमिका काय असेल? हे दोन्ही पक्ष स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
राज्यात शिवसेनेसोबत 'महाशिवआघाडी'चं सरकार बनवण्यासाठी दोन्ही पक्ष अनुकूल दिसत असले तरी वाटाघाटीसंबंधी तिन्ही पक्षांचं अजूनही एकमत झालेलं दिसलं नाही.
सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते दिल्लीहून मुंबईत दाखल झालेले आहेत. यात अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल आणि वाय बी चव्हाण यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही आपल्या मातोश्रीहून बाहेर पडले आहेत. मढमधल्या 'हॉटेल रिट्रीट'वर शिवसेना आमदार त्यांची वाट पाहत आहेत.