मुंबई : कोरोनाचे संकट वाढत आहे. प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. त्यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी भारताने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मात्र यावरुन शिवसेनेने पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. लोकांच्या मनात संभ्रम दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांचे भाषण हे अधिक संयमी, जनतेला विश्वासात घेऊन काही सांगू पाहणारे होते. एका वाक्यात सांगायचे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धाटणीचे होते. गोरगरिबांना नोकरीवरुन काढू नका हे त्यांचे आवाहन दिलासा देणारे आहे. या गोष्टीकडे सरकारने एका जाणिवेने पाहायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी सरकार काय करत आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. जेव्हा देशात एकही कोरोना रुग्ण नव्हता, त्याच्या आधीपासूनच आपण देशाच्या बाहेरून येणार्या लोकांची चाचणी सुरु केली आहे. आता सत्य असे आहे की, २१ दिवसांपूर्वी ‘लॉकडाऊन’ सुरू झाले तेव्हा संपूर्ण देशात ५१६ कोरोना रुग्ण होते. ते आता १२ हजारांवर गेले आहेत. दुसरे असे की बाहेरुन येणार्या लोकांची चाचणी सुरू केली हे खरे असेल तर ५६ देशांतून लोक दिल्लीतील ‘मरकज’ला पोहोचले कसे, हा प्रश्न आहेच. पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित करत भाजपला चांगलेच घेरले आहे.
यावेळी केंद्राच्या बोटचेप्या धोरणावर जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यांना कमजोर करुन आणि मुख्यमंत्र्यांची युद्धसामग्री कमी करुन कोरोनाशी लढता येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यांनीच लढायचे आहे आणि पंतप्रधानांनी मार्गदर्शन करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात आणि सांगतात तसेच मोदी बोलले. त्यांच्या चेहर्यावर थोडी चिंता होती, पण त्यांनी देशाला विश्वास दिला. हा विश्वास पुढच्या युद्धासाठी महत्त्वाचा असल्याचे शिवसेनेने नमुद केले आहे.
महाराष्ट्रात पंतप्रधान मदतनिधी की मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा घोळ घातला गेला आहे. हा गोंधळ टाळता आला असता. राज्यांना कमजोर करुन आणि मुख्यमंत्र्यांची युद्धसामग्री कमी करुन कोरोनाशी लढता येणार नाही, असाही स्पष्ट इशारा शिवसेनेने दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून जे भाषण केले त्यावर विरोधकांनी अकारण टीका करण्याचे कारण नाही. मोदी यांनी ३ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविले आहे. म्हणजे युद्धाचा कालावधी वाढवला आहे. १३० कोटी लोकांना ३ मेपर्यंत शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे घरातच बसून राहावे लागेल, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची चिंता समजण्यासारखी आहे. पण मध्यप्रदेशसारखे राज्य कोरोनाविरुद्धच्या लढाईत खूपच मागे पडले आहे. तेथे संपूर्ण सरकार नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाही. तेथील काँग्रेसचे सरकार पाडून भाजपने आपला मुख्यमंत्री बसवला, पण मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे एकटे शिवराजसिंह चौहानच इकडेतिकडे धावत आहेत. हे राजकारण थोडे पुढे ढकलता आले असते, असे सांगत भाजपचे कान टोचले आहे.