मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, त्याआधी विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात आल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची 'काळजीवाहू' म्हणून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आज राष्ट्रपती राजवट लागू होताच त्यांनी ट्विवटर हँडलवरचे आपल्या नावापुढील 'काळजीवाहू मुख्यमंत्री' पद काढून 'महाराष्ट्राचा सेवक' असे नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आली आहेत. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील 'काळजीवाहू' मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही संपुष्टात आली. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांच्या ट्विवटर हँडलवरचे 'काळजीवाहू मुख्यमंत्री' पद काढून 'महाराष्ट्राचा सेवक' असे लिहले आहे.
शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिला होता. त्यामुळे बहुमतासाठीचे संख्याबळ नसल्याने भाजपने सरकार बनविण्यास असमर्थ असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्ट केले होते. त्यानंतर कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहण्यास सांगितले होते. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर वॉलवर मुख्यमंत्रीपदापुढे 'काळजीवाहू' हा शब्द लिहिला होता.