शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार राजीनामा

भाजपापुढे सरकार स्थापन करणं किंवा दावा सोडणं असे दोनच पर्याय

Updated: Nov 7, 2019, 10:04 PM IST
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार राजीनामा title=

अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे तांत्रिक बाब म्हणून ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवतील. त्यानंतर राज्यपाल नवं सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांनाच कारभार पाहण्याची विनंती करतील. 

दरम्यान, निकालानंतर गुरुवारी १५ वा दिवसही वेगवान राजकीय घडामोडींचा पण अनिर्णितच राहिला. आजच्या घडामोडींची केंद्र होती मातोश्री, वर्षा बंगला आणि राजभवन... मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आमदारांनी पक्षप्रमुखांच्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची मागणी ही एकट्या संजय राऊतांची नाही, तर तमाम शिवसैनिकांची आहे यावर शिक्कामोर्तब झालं... 

शिवसेनेमध्ये हे घडत असताना भाजपाचे मंत्री राज्यपालांना भेटून आले. मात्र भाजपानं सत्तास्थापनेचा दावा केलाच नाही. भाजपाची कालचीच भूमिका आजही कायम राहिली. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपा नेत्यांच्या बैठकांचं सत्रही सुरू राहिलंय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आज वर्षा बंगल्यावरूनच सूत्र हलवत होते. 
  
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपा नेत्यांनी राज्यपालांसोबत कायदेशीर बाबींची चर्चा केली. त्यांना सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन व्हावं अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

राज्याची राजकीय परिस्थिती अद्याप अंतिम पर्यायापर्यंत पोहोचलेली नाही, असं राज्याचे माजी ऍडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी म्हटलंय. आजमितीस भाजपापुढे सरकार स्थापन करणं किंवा दावा सोडणं असे दोनच पर्याय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कुणीही दावा केला नाही, तरी राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी पाचारण करू शकतात, असं ते म्हणाले.