मुंबई : विनोद तावडे यांच्याकडून शिक्षण विभाग काढून घेतल्याने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे तावडेंवर कवितेतून निशाणा साधला आहे. युती सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांना झटका दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेलं शालेय शिक्षण खाते हे विनोद तावडे यांच्याकडून काढून नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे.
तावडेंचा कारभार होता गोल गोल
शिक्षणांचा वाजवला होता ढोल ढोल
शेलार तरी सावरणार का तोल?
शेलार, तुमच्यावर भरोसा ठेवायचा का?
नवनिर्वाचित शिक्षणमंत्री @ShelarAshish यांचे अभिनंदन!
स्टेट बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देऊन केलेल्या अन्यायाला न्याय द्या. @TawdeVinod— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 17, 2019
प्रकाश मेहता यांचं खातं विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे,. सुभाष देशमुख यांचं पणन हे महत्वाचे खाते राम शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेले कृषी खाते हे अपेक्षेप्रमाणे डॉ अनिल बोंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास खात्याचा भार देण्यात आले.
आरपीआय गटाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्याकडे सामाजिक न्याय खाते देण्यात आले आहे. तर भाजपकडे असलेले जलसंधारण खाते हे शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्याकडे दिले गेले आहे. रोजगार हमी आणि फलोत्पादन ही भाजपकडे असलेली खाती शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना मिळाली आहेत.