मुंबई : धारावीत गेल्या २ दिवसांत कोरोनाचे तब्बल १२७ रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ४९६ वर पोहोचली असून एकूण मृत्यूंची संख्या १८ वर पोहोचली आहे. धारावीत काल ३८ आणि आज ८९ असे एकूण १२७ रूग्ण निदर्शनास आले आहेत.
आतापर्यंत धारावीत सर्वाधिक म्हणजे ८९ रूग्ण आज सापडले. धारावीतील ४९६ पैकी २२१ रूग्ण हे गेल्या ६ दिवसांत वाढलेत. मागील रविवारी २७५ एकूण रूग्ण होते. राज्यातील बळींची संख्या पाचशेवर गेली आहे.
धारावीत आतापर्यंत ७९ हजार लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून त्यापैकी २५ हजार हे गेल्या आठवडाभरात करण्यात आले आहे. यात लक्षणे आढळलेल्या १९२० जणांना क्वारंटाईन करून त्यांची टेस्ट करण्यात आली आहे.
३५० खाजगी डॉक्टर तसेच ९ पालिका दवाखाने यांच्यामार्फत स्क्रिनिंग सुरू आहे. यात ज्यैष्ठ नागरिक आणि कंटेनमेंट झोनकडे सर्वाधिक लक्ष दिलं जातंय
सध्या धारावीत ४ ठिकाणच्या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये २०५० जणांना ठेवण्यात आल आहे.
माहिममध्ये १७ आणि दादरमध्ये १३ नविन कोरोना रूग्ण वाढले. तर माहिममध्ये आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या ५२ आणि दादरमध्ये एकूण कोरोना रूग्णांची संख्या ४६ वर पोहचली आहे.
राज्यात ७९० नविन रूग्ण वाढले तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रूग्ण संख्या १२,२९६ तर एकूण मृत्यू संख्या ५२१ वर गेली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत सर्वाधिक ५४७ रूग्ण वाढलेत तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे.