मुंबई : एलफिन्स्टनची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची विचारपूस केल्यानंतर मीडियाला दिली.
या प्रकारणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. जे दोषी असतील त्यांच्यावर त्वरीत कारवाई केली जाईल. तसेच रेल्वे मंत्रालयाने पादचारी पुलांचे ऑडिट सुरू केले आहे, जेणेकरून पुन्हा अशी दुर्घटना होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केईएम रुग्णालायत जाऊन एलफिन्स्टन दुर्घटनेतील जखमींची केली विचारपूस.
एलफिन्स्टन रोड स्थानकावर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन ८ महिला आणि एका लहान मुलासह तब्बल २२ जणांचा त्यात बळी गेला, तर ३९ प्रवासी जखमी झाले. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान, राज्य शासन आणि केंद्र सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली आहे.