मुंबई : बुधवारी सायंकाळपासून रिजर्व्ह बँकेकडून येस बँकेवर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्यात येणार आहेत. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे निर्बंध हणार असल्याची माहिती आहे. ज्यानंतर बँकेचं कामकाज दैनंदिनपणे सुरु होणार आहे.
निर्बंध उठणार असल्यामुळे याचा सर्वात मोठा दिलासा हा खातेधारकांना होणार आहे. १९ मार्चपासून त्यांना बँकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. खातेदारांना आता रोख रक्कम काढण्यावर कोणत्याही निर्बंधाची चिंता नसणार आहे. भारतीय स्टेट बँकच्या अध्यक्षपदी असणाऱ्या रजनीश कुमार यांनी याविषयीची माहिती एका पत्रकार परिषदेत दिली. देशभरातील जवळपास १ हजारहून जास्त शाखांमध्ये ग्राहकांना सहज व्यवहार करता येणं शक्य होणार आहे.
आतापर्यंत खातेधारकांना त्यांच्या खात्यातील ५० हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत होती. तसेच शिक्षण, लग्नसमारंभ, वैद्यकीय खर्चासाठी अटींवर ५ लाख रुपये काढता येत होते. यापूर्वी येस बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, यूपीआय पेमेंट आणि एटीएममधून पैसे काढण्यासही समस्यांचा सामना करावा लागला होता.
दरम्यान खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक या दोन बँका येस बँकेत गुंतवणुकीसाठी पुढे सरसावल्या असल्याचं वृत्त होतं. दोन्ही बँकांनी प्रत्येकी १ हजार कोटी रूपये गुंतवणार असल्याची घोषणाही केली होती. त्यामुळे आता हे व्यवहार पाहता तूर्तास येस बँकेच्या खातेधारकांना दिलासा मिळाला आहे हे खरं.