मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुरक्याची चादर पाहायला मिळतेय. ओखी चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या विचित्र वातावरणामुळे नागरिकांचा दम निघालाय.
ज्यांना श्वसनविकार आहे, अशा रुग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, तर मुलांमध्ये रात्री खोकल्याची उबळ येण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळतंय.
धुरक्यामुळे फुफ्फुस आणि श्वसनासंदर्भातील आजार वाढण्याची भीती आहे. दमेकरी, श्वसनाचे आणि छातीचे आजार असणा-यांनाही धुरक्याचा त्रास होऊ शकतो.
धुळीची एलर्जी असणा-या रुग्णांना शिंका येणे, खोकला येणे, नाक चोंदणे अशा तक्रारी भेडसावू शकतात. शिवाय गर्भपात होण्याचा धोका 2 टक्क्यांनी वाढण्याची भीतीही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. या वातावरणाचा सगळ्यात जास्त धोका मजूर, पोलीस, कामगार आणि लहान मुलांना असल्याची भीतीही व्यक्त होतेय.