अजित मांढरे झी मिडिया मुंबई : मुंबईत एक धक्कादायक बातमी घडली आहे. संकटकाळी एकमेकांना मदत करा, असं आवाहन करणारे पोलीस सामान्य नागरिकांशी कसे वागतात, याचं विचित्र उदाहरण समोर आलंय..... एका जखमी व्यक्तीला मदत करणा-या तरुणालाच पोलिसांनी त्रास दिला....पाहुया हा धक्कादायक रिपोर्ट....
रविवारी रात्री ९ च्या सुमाराला चर्नीरोड रेल्वे स्टेशनवरच्या रेल्वे रुळांवर एक प्रवासी जखमी अवस्थेत पडला होता. श्रवण तिवारी या तरुणानं जखमी प्रवाशाला सैफी रुग्णालयात दाखल केलं आणि त्याचा जीव वाचला. पोलिसांना हे कळताच पोलिसांनी श्रवण तिवारीलाच उलटसुटल प्रश्न विचारायला सुरुवात केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणा-यांना, तसंच जखमींची माहिती पोलिसांना देणा-यांना त्यांची इच्छा असल्याशिवाय कोणतेही प्रश्न विचारू नयेत. किंवा त्यांना कोणत्याही शासकीय प्रक्रियेत सामील करुन घेऊ नये. असं असतानाही जखमी प्रवाशाला हात का लावला, पोलिसांना का कळवलं नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती श्रवणवर करण्यात आली. एवढंच नाही तर रात्री दोन वाजेपर्यंत त्याला पोलीस स्टेशनमध्ये थांबवून चौकशी करण्यात आली.
घडलेल्या या सगळ्या प्रकाराची आता चौकशी सुरू आहे. रेल्वे अपघातात अनेकांचा जीव जातो, अशावेळी एखादा तरुण त्या व्यक्तीला वाचवत असेल तर त्याला पोलिसांनी सहकार्य करायचं की त्याच्यावरच संशय घेऊन त्याला चौकशीच्या जाळ्यात अडकवायचं. आता या प्रकरणी जो पोलीस दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.