मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून रविवारी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यानंतर फडणवीस यांचे अभिनंदन करताना सभागृहात शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळ यांनी एकीकडे फडणवीसांचे अभिनंदन करताना 'मी पुन्हा येईन' या घोषणेवरून त्यांना चिमटेही काढले. सत्ताधाऱ्यांच्या या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीस यांनीही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितले नव्हते, त्यामुळे वाट पाहा, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले.
उद्धव ठाकरे फडणवीसांना विरोधीपक्ष नेता मानायला तयार नाहीत -एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या एकूण भाषणांचा नूर पाहता आगामी काळात त्यांच्याकडून अनपेक्षित डाव खेळला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. विधानसभेत शनिवारी ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव १६९ विरुद्ध ० अशा मतांनी मंजूर झाला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांचीही बिनविरोध निवड झाली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला
त्यामुळे ठाकरे सरकारची आगामी वाटचाल निर्धोकपणे पार पडेल, असे सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांनी राजकीय परिस्थितीबाबत पुन्हा संशयाचे धुके निर्माण झाले आहे. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,' अशा कवितेच्या ओळी देवेंद्र यांनी भाषणादरम्यान म्हटल्या. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी काळात आणखी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.