मुंबई : राष्ट्रवादीचे बीडमधील नेते आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. क्षीरसागर यांच्या हातात शिवबंधन बांधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. पक्ष प्रवेशानंतर क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर अन्याय झाला आहे. आपण पक्षबांधणीचे काम केले, पक्ष वाढवला तरी पक्षाकडून अन्याय झाला. त्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेनेचे काम जोमदारपणे करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी मातोश्रीवर केला.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत, क्षीरसागर परिवाराचे शिवसेनेत स्वागत करतो. एक्झिट पोल आणि त्यांच्या प्रवेशाचा काहीही संबंध नाही. शिवसेना वाढत आहे, शिवसेनेवरील विश्वासाहर्ता वाढली आहे. क्षीरसागर यांना कधीही पश्चाताप होणार नाही. शिव सेना वाढविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. बीड जिल्ह्याकडे आम्ही थोडे दुर्लक्ष केले होते, पण आता शिवसेना तिथे मजबूत होईल, असा दावा ठाकरे यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. प्रत्यक्ष निकाल जाहीर होईपर्यंत मी काहीही बोलत नाही. त्यावर उद्या जिंकल्यानंतर बोलू असे म्हणत भाष्य करणे टाळले. मी मीडियालाच विचारतोय,एक्झिट पोल कुणाच्या बाजुने आले आहेत? एनडीएच्या ना. मग, एक्झिट पोलही इव्हिएमवरुनच काढले का, असा प्रतीसवाल विचारला. त्याचवेळी त्यांनी एक्झिट पोलचे आकडे फिरु शकतील या विरोधकांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. मीडियाला उद्देशुन ते म्हणालेत, तुम्ही सांगताय ते आकडे कमी पडतील?