कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयात लिंग परिवर्तनासाठी एक वेगळंच प्रकरण आलंय. लेस्बियन असलेल्या आणि एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन तरूणींपैकी एकीला पुरूष होवून तिच्या मैत्रिणीशी लग्न करायचंय. पण सरसकट कुणाचंही लिंगपरिवर्तन करता येत नसल्याचं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलंय. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर बीडच्या ललिता साळवेची ललित साळवे झाल्यानंतर मुंबईतल्या सेंट जॉर्ज रूग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्यात. उत्तर प्रदेशातल्या एका तरूणीला लिंगबदल करून पुरूष व्हायचंय. पण डॉक्टरांनी तिला नकार दिलाय. कारण लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी निकष तयार करण्य़ात आलेले आहेत.
- जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर असलेल्यांनाच लिंगबदल शस्त्रक्रिया करता येते
- मानसिक स्थितीचं मूल्यमापन केल्यानंतरच लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी मिळते
- शिवाय ज्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते त्याचे हार्मोन तपासले जात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय
आत्तापर्यंत १७ जणांनी सेंट जॉर्ज रूग्णालयाशी लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी संपर्क साधलाय. अपुरी माहिती घेऊन असे रूग्ण येत असले तरी वैद्यकीय चाचण्या आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय लिंगबदल होत नसल्याचं रुग्णालयानं सांगितलंय.
एलजीबीटी समुहातील कोणालाही कायदेशीर लिंगबदल करता येणार नाही, असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळं उत्तर प्रदेशातून आलेल्या तरूणीची निराशा झालीय.