देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : लोकसभेपूर्वी कुठल्याही निवडणुका होतील असं वाटत नाही असं नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आता मनसे (MNS) नेते आणि पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तयारीला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावरती निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
त्यानुसार लोकसभा निहाय मनसेच्या बैठकांना सुरुवात झालेली आहे. मनसे नेते लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. एका लोकसभेसाठी मनसेचे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार मनसे नेत्यांनी लोकसभा निहाय बैठकींना सुरुवात केलेली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नुकतंच पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही रायगड मधील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केलीये.
लोकसभा निहाय मनसेच्या कुठल्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?
मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे पुण्याची जबाबदारी
मनसे नेते बाबू वागस्कर यांच्याकडे शिरूर लोकसभेची जबाबदारी
मनसे सरचिटणीस वसंत मोरे यांच्याकडे बारामतीची जबाबदारी
मनसे सरचिटणीस अमेय खोपकर यांच्याकडे मावळची जबाबदारी
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे छत्रपती संभाजी नगरची जबाबदारी
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडे रायगड लोकसभेची जबाबदारी
मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्याकडे नाशिक लोकसभेची जबाबदारी
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे कल्याण लोकसभेची जबाबदारी
मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे पालघर भिवंडी ग्रामीणची जबाबदारी
मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडे दक्षिण मुंबई लोकसभेची जबाबदारी.
मनसे नेते नितीन सरदेसाई,अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याकडे उत्तर मुंबई जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसे नेते शिरीष सावंत यांच्याकडे ईशान्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर,शालिनी ठाकरे, संदीप दळवी यांच्याकडे उत्तर पश्चिमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मनसेचा स्वबळाचा नारा
आगामी निवडणुकीत मनसेने स्वबळावर लढण्यााचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मनसेचं इंजिन महापालिका निवडणुकीत एकटंच धावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणुकीस स्वबळावर सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. काही महिन्यांपुर्वी मनसेने एक टीझर (Teaser) लाँच केल होता. या टीझरमध्ये 'चला हे चित्र बदलूया… आपण महाराष्ट्राला पर्याय देऊया…, चला नव्याने स्वप्न पाहूया… महाराष्ट्र घडवूया…', असं सांगण्यात आलं होतं. या टीझरला 'महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पर्याय द्यायला तयार आहे…!, असं कॅप्शन देण्यात आलं होतं.